⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

जळगावकरांनो सावधान.. रात्रीच्या वेळी रुग्णवाहिकेतून येताय चोरटे

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । शहरातील दुचाकी, चारचाकी चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून चोरीच्या घटना लक्षात घेता चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत आहेत. जळगाव शहरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चारचाकी चोरण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून धडक दिल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भुसावळ येथील कुणाल रामदास हटकर हे जळगावातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या छाबडा सर्जिकल दुकानात काम करतात. हटकर हे ऑफिसच्या कामानिमित्त दि.२५ रोजी स्वतःची चारचाकी क्रमांक एमएच.१९.बीजे.०५५४ ही गोल्ड सिटी हॉस्पिटलसमोर लावून इंदोर येथे गेले होते.

दि.२५ रोजी रात्री अकराच्या सुमारास रुग्णवाहिकेतून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या चारचाकी शेजारी रुग्णवाहिका लावली. टॉमीच्या साहाय्याने चोरट्यांनी चारचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. जळगावी परतल्यावर दि.२६ रोजी हटकर यांना घडलेला प्रकार लक्षात आला. दुसऱ्या दिवशी त्यांनी छाबडा एजन्सीजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटे दिसून आले आहेत.

कुणाल हटकर यांनी याप्रकरणी शहर पोलिसांना माहिती दिली आहे. रुग्णवाहिकेतून चोरी करण्याचा प्रकार धक्कादायक असून रात्रीच्या वेळी पोलिसांना चकवा देण्यासाठी चोरट्यांनी लढविलेली ही शक्कल कमाल आहे. नागरिकांनी स्वतःच्या वाहनांची रखवाली स्वतःच ठेवणे गरजेचे झाले असून पोलीस प्रशासन दुचाकी, चारचाकी चोरट्यांना पकडण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.