⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

जामनेरात मोहन भुवन प्रतिष्ठानचा दान धर्माचा निधी चोरट्यांनी केला साफ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । जामनेर येथील मोहन भुवन या सामाजिक संस्थेच्या रकमेसह विनोद लोढा यांच्या दागिने तसेच वैयक्तिक रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पाचोरा रोडवरील एटीएम फोडून चोरट्यांनी बारा लाख लंपास केल्याची घटना घडली होती. एकापाठोपाठ झालेल्या या चोऱ्यांमुळे जामनेर पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

मोहन भुवन हे विनोद लोढा यांचे जामनेरातील मध्य वस्तीतील निवासस्थान. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या या बंद घराचा कोयंडा तोंडून चोरट्यांनी चांदीचे दागिने, ताट- वाट्यांसह देवाच्या मुर्ती अशी तब्बल चार किलो चांदी, काही सोन्याचे दागिने व काही रोकड असा तब्बल सव्वापाच लाख रूपयांचा मुद्देमाल शुक्रवारी मध्यरात्री लंपास केला. विनोद लोढा काही कामानिमित्त मुंबईला गेल्याने त्यांचे घर बंद होते. सुरक्षेसाठी असलेल्या लोखंडी दरवाज्याचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटांसह लोखंडी पेट्या उचकटून मोहन भुवन प्रतिष्ठानचे तब्बल २ लाख ९३ हजार रुपयांसह वैयक्तिक रक्कम व दागिने असा सव्वापाच लाख रूपयांचा मुद्देमाल घरात होता. सहकाऱ्यांनी दिलेली माहिती पाहता जवळपास सर्वच मुद्देमाल लंपास झाला असावा, असा अंदाज विनोद लोढा यांनी फोनवरुन पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पाचोरा रोडवरील एटीएम फोडून चोरट्यांनी बारा लाख लंपास केल्याची घटना घडली असून एकापाठोपाठ झालेल्या या चोऱ्यांमुळे जामनेर पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

घरी आल्यावर हाेईल स्पष्ट
काही कामानिमित्त मी कुटुंबासह मुंबईला गेलो होतो. कडाक्याची थंडी असल्याने नागरिक लवकर झोपतात. त्यामुळेच कुणाला आवाज आला नसावा. सोने-चांदीचे दागिन्यांसह सव्वापाच लाखांची रक्कम होती. घरी पोहाेेचल्यानंतर सर्व स्पष्ट होईल.असे विनोद लोढा, अध्यक्ष, मोहन भुवन प्रतिष्ठान, जामनेर यांनी सांगितले.

हॅपी श्वानने दाखवला चोरट्यांचा मार्ग
जामनेरातील मोहन भुवनमधील चोरीची माहिती मिळताच पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तर हॅपी श्वान पथकाद्वारे पोलिस कॉन्स्टेबल संदीप परदेशी, मनोज पाटील यांनी तपासणी केली. चोरी करून घराबाहेर पडल्यानंतर काही अंतरावरून चोरटे निघून गेल्याचा अंदाज या वेळी वर्तवण्यात आला.

दानधर्मात व्यत्यय
मोहन भुवन प्रतिष्ठान ही सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था आहे. कोविड काळापासून वृद्ध, अनाथांना दरमहा रोख पेन्शन, काही कुटुंबांना किराणा किट, कपडे, ब्लँकेट्स यासारखी मदत प्रतिष्ठानमार्फत नियमित दिली जाते. त्यामुळे लोढा यांच्या घरात नेहमीच रक्कम उपलब्ध राहत असावी, असा अंदाज बांधून चोरट्यांनी संधी साधली असावी. यामुळे मात्र दान-धर्माच्या कार्यात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :