उत्तर प्रदेशातील त्या भामट्याला भुसावळमध्ये पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । रेल्वे प्रवासात प्रवाशांची गोड बोलून त्यांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देवून लुटणार्‍या युपीतील भामट्याला रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे. आरोपीविरोधात यापूर्वी ठिकठिकाणी सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. मिश्रीलाल द्वारका प्रसाद मौर्य (67, भवैरनगर, मेहनवण, जिल्हा-गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लूट प्रकरणी दाखल होता गुन्हा
तक्रारदार शिवदास रामचंद्र पाटील (67) हे 5 जानेवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून अप 12860 गीतांजली एक्स्प्रेसने जळगाव-कल्यासण प्रवास करीत असताना आरोपी मौर्य याने त्यांना प्रवासात गुंगीचे औषध टाकलेला लाडू खाण्यास दिल्यानंतर त्यांची शुद्ध हरपताच आरोपीने त्यांच्याकडील एक लाख 11 हजारांचा ऐवज लांबवला होता. कल्याण आल्यानंतर प्रवाशाने रेल्वे पोलिसात तक्रार केल्यानंतर हा गुन्हा भुसावळात वर्ग करण्यात आला.

रेल्वे सुरक्षा बलाकडूनही या प्रकरणी तपास सुरू असताना शनिवार, 22 जानेवारी रोजी दुपारी दिड वाजता इन्स्पेक्टर बायनी प्रसाद मीना, स्टाफ कॉन्स्टेबल अरुण कुमार आणि कॉन्स्टेबल सागर वर्मा यांनी ट्रेन 01139 मध्ये मनमाड-नाशिक दरम्यान संशयीताला ताब्यात घेतल्यानतर त्याच्या बॅगेत 24 हजारांची रोकड, औषध टाकलेल्या लाडूंचा टिफीन बॉक्स, मेरफॅक्स औषधी बॉक्स, आधार कार्ड व कपडे आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरोधात बीना, अन्नपूर आदी ठिकाणी सुमारे सहा गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.