जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार कापूस उत्पादकांना, तर १२ हजार सोयाबीन उत्पादकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
गेल्यावर्षी राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील सरासरीहून कमी पाऊस झाला होता. यासह पिकांवर रोग पडल्याने खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जळगाव जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या नुकसानीच्या मोबदल्यात उपाययोजना आखून राज्य शासनाने गतवर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यात ज्या शेतकऱ्यांनी इ पीक पेरावर पिकांची नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात जवळपास ३ लाख ६९ हजाराहून अधिक शेतकरी ठरले आहेत. ज्यात ३ लाख ५७ हजार कापूस उत्पादक, तर १२ हजार सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. ज्यांनी ई-पीक- पेऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ५ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी सादर करावी लागणार आहे. यासह शेतकऱ्यांनी संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने कृषी विभागाकडे सादर करावे.