जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२५ । मागील काही काळापासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष आधीच तयारीला लागले आहे. दरम्यान, यंदाच्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार अशी चर्चा असून यातच भारतीय जनता पक्ष बाजी मारणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कारण त्यांनी मागील निवडणुकीत मोठा बहुमत मिळवला होता.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी स्थिती असून गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढू शकतील; अशी स्थिती जळगाव दिसून येत आहे. मात्र या निवडणुकीत जळगावमध्ये महायुती हाेण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण २०१८ मध्ये झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीवेळी महायुतीचा घटकपक्ष भाजपने ५७ जागा जिंकून पालिकेत सत्ता मिळविली होती. यावेळी भाजपसह शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, एमआयएम पक्ष वेगवेगळे लढले हाेते. मात्र राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर जळगाव महापालिकेतही धक्कातंत्र पाहायला मिळाला. भाजपने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर देखील अडीच वर्षानंतर सत्तांतर झाले होते.

महायुतीत जागा वाटपाची शक्यता कमीच
आता यंदाच्या निवडणुकीत देखील जळगाव महापालिकेवर भाजपचं बाजी मारणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे भाजप महायुतीतील मित्र पक्षाना जास्त जागा देण्यास तयार नाही. तर महायुतीतील शिंदे गटाकडे माजी नगरसेवक २० पेक्षा अधिक असल्यामुळे ते कमी जागा घेण्यास तयार नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाकडे एकही नगरसेवक नसला तरी त्यांच्याकडून दावा केला जात आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपात एकमत हाेण्याची शक्यता कमीच आहे.
महाविकास आघाडीला फायदा होईल का?
दरम्यान महायुतीमधील या भानगडीत महाविकास आघाडी एकत्र लढली तरी त्यांना जास्त काही फायदा नाहीय. कारण शिवसेना (ठाकरे गट) कडे १२ नगरसेवक असून यातील काही भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) व काॅंग्रेसची काेणतीही ताकद शहरात नसल्यामुळे एकत्र लढूनही महाविकास आघाडीला फायदा होईल असे चित्र सध्यातरी दिसत नाही.











