जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । चोपडा शहरातील मेन रोडवरील सोने चांदीचे लक्ष्मी ज्वेलर्स दुकान दि. १४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरटे चारचाकी व्हॅगनार गाडीमध्ये येऊन दुकान फोडून एक लाख ब्यांनऊ हजार किंमतीची तीन किलो चांदी लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने चोरट्यांना जेरेबंद करण्यात पोलिसांना मदत होणार आहे.
शहरातील रहिवासी हेमंत पुखराज जैन ( ४८, रा मोठा माळीवाडा) यांच्या मालकीचे मेन रोडवर सोने चांदीचे लक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान आहे. दि १४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चारचाकी व्हॅगनर गाडी मधून (एम एच ०९ – ए क्यू १५५९) आलेल्या २५ ते ३० वयोगटातील चार चोरट्यांनी लक्ष्मी ज्वेलर्सचे कुलूप लावलेल्या शटरची पट्टी कटरने कापून तसेच दुकानाच्या आत असलेल्या काच फोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील ८४ हजार किंमतीचे १४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे, ८४ हजार किंमतीचे १४०० ग्रॅम वजनाचे चांदीच्या अंगठ्या, २४ हजार किंमतीचे ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे लोटे असे एकूण १ लाख ९२ हजार किमतीचा मुद्देमाल लंपास करून सिल्वर कलरच्या चारचाकीतुन चोरटे पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली घटना तपासून तपासाची चक्रे फिरवली आहेत. घटनास्थळी जळगाव येथून श्वानपथक येऊन आरोपीचे ठसे घेण्यात आले. हेमंत जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.