जळगावात पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच चोरट्यांचा डल्ला ; असा लांबविला ऐवज..
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक राहिला नसल्याचं दिसतेय. याच दरम्यान आता मालेगावचे पोलिस उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे यांच्या जळगावात शहरातील पिंप्राळ्यातील समर्थ कॉलनीतील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ६३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, रेकी करून चोरट्यांनी हा डाव साधल्याचा संशय आहे.
पिंप्राळ्यातील समर्थ कॉलनीत काशीनाथ कोळंबे हे पत्नी संगीता यांच्यासह वास्तव्यास आहेत. २५ रोजी सकाळी कोळंबे मालेगाव ड्युटीसाठी गेले, त्यानंतर त्यांची पत्नी घराला कुलूप लावून साळवा येथे आजारी बहिणीला भेटण्यासाठी गेल्या, घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात डल्ला मारला. २९ रोजी सकाळी ८ वाजता संगीता या घरी परतल्यावर
त्यांना घराचे कुलूप, लाकडी दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेले दिसले. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्यानंतर त्यांना चोरो झाल्याची खात्री झाली. कपाटात उघडे आणि त्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले होते. ही घटना त्यांनी पती काशीनाथ यांना कळवल्यानंतर काही वेळाने रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर संगीता कोळंबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांकिघ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चोरीला गेलेला ऐवज असा
१० हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम सोन्याची चेन, १० हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चीप, ३ हजार रूपये किमतीचा चांदीचा छल्ला, ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण ६३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.