जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । शहरातील तांबापुरा भागातील फुकटपुरा परिसरात घरांना बाहेरून कडी लावत डल्ला मारण्याचा प्रकार घडला होता. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासात छडा लावत मेहरूणच्या जंगलातून एक अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याचा एक साथीदार सोनु सलीम शेख रा.फुकटपुरा हा पोलिसांचा सुगावा लागताच पसार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
तांबापुरा परिसरात असलेल्या फुकटपुरा भागात चोरट्यांनी सरफराज खान अय्युब खान यांच्या घरात डल्ला मारून ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावून आपला डाव साधला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निरीक्षक प्रताप शिकारे यांनी तयार केलेल्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सुधीर साळवे, पोलीस नाईक इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, पो.कॉ. गोविंदा पाटील व सचिन पाटील यांच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत मेहरूणच्या जंगलातून एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. दुसरा एक पळ काढण्यात यशस्वी ठरला.
एमआयडीसी पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त बालकाला बाल न्यायालयात हजर केले होते. बालकावर यापूर्वी एमआयडीसी पोस्टेला १ तर जिल्हापेठ पोस्टेला २ गुन्हे दाखल आहेत. बालकाने गुन्ह्याची कबुली दिली असून ६१ हजारांचा ऐवज काढून दिला आहे.