⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भाजपच्या हवेत उड्या.. महापौर, उपमहापौरांचे पद पुढील अडीच वर्ष सुरक्षीत

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहर मनपातील भाजपाची सत्ता उलथवून टाकत शिवसेनेने जळगाव मनपावर भगवा फडकवला होता. भाजप बंडखोर नगरसेवकांच्या साथीने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. भाजपातील ३ आणि ९ बंडखोर पुन्हा भाजपात परतले असून माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी सत्तांतरबाबत दसरा, दिवाळीनंतर बघू असे वक्तव्य केले होते. दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १९ नुसार पुढील अडीच वर्षे महापौर, उपमहापौरांवर कोणत्याही प्रकारे अविश्वास आणता येणार नसल्याने त्यांचे पद सुरक्षितच आहे.

जळगाव मनपाचे राजकारण गेल्या सहा महिन्यांपासून चांगलेच ढवळून निघाले आहे. करेक्ट कार्यक्रम करीत शिवसेनेने महापौर पदाच्या निवडणुकीत डाव खेळाला आणि भाजपचे नगरसेवक गळाला लावले. भाजप बंडखोरांच्या बळावर सेनेच्या महापौर मनपात बसल्या. जळगाव शहर मनपात सध्या महापौर जयश्री महाजन तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे आहेत. भाजपाचे बहुमत असून देखील त्यांची सत्ता नाही.

भाजपातून बाहेर पडलेल्या बंडखोरांपैकी १२ नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत. दोन दिवसांपूर्वी ९ नगरसेवक स्वगृही परतल्यावर जिल्ह्याचे भाजप नेते आ.गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सत्तांतरबाबत दसरा, दिवाळीनंतर बघू  असे सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १९ नुसार महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा असतो. एकदा त्यांची निवड झाल्यानंतर ते स्वतःहुन राजीमाना देत नाही किंवा त्यांचे निधन होत नाही तोवर ते कार्यकाळ संपेपर्यंत पदावर असतात.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १९ नुसार जळगावच्या महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे पद सुरक्षित असून सदस्यांचे संख्याबळ कमी अधिक झाले तरीही त्यांना काहीही फरक पडणार नाही. स्थायी समिती सभापती पदाचा कार्यकाळ देखील वर्षभरासाठी ग्राह्य धरला जातो.

महापौर, उपमहापौर पदाची स्वप्ने पाहू नये : नितीन लढ्ढा

जळगाव मनपाच्या महापौर शिवसेनेच्या जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील हे आहेत. मनपातील संख्याबळ दोन तृतियांश बदलले तरीही तेच पदावर राहतील. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम १९ नुसार दोघांची पदे पुढील अडीच वर्षे शाबूत राहणार आहेत. भाजपने महापौर आणि उपमहापौर पदाची स्वप्ने पाहू नये असा टोमणा शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी लगावला आहे.