जळगावात घरफोडीचे सत्र थांबेना! शिक्षकाचे बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला
जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून यातच चोरट्यांनी शहरातील शिक्षक मयूर बाळासाहेब देशमुख ( वय ३६, रा.गौरी प्राईड अपार्टमेंट, भोईटेनगर) यांचे घर फोडून ३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील भोईटेनगरात वास्तव्यास असलेले शिक्षक मयूर बाळासाहेब देशमुख हे परिवारासह अडावद येथे उत्तरकार्यासाठी गेले होते. चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत, दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
असा ऐवज लांबविला
घरातून १ लाख ४० हजार रुपये किंमतेचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ७० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगळ्या, ७० हजार रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, तर काही चांदीचे दागिणे मिळून ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
सोमवारी सकाळी मयूर देशमुख यांच्या शेजाऱ्यांना देशमुख यांच्या घराच्या दरवाज्यावरील कडी-कोयंडा पडलेला दिसला. लागलीच शेजारच्यांनी मयूर देशमुख यांना फोन करुन, त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली. काही वेळानंतर देशमुख परिवार घरी पोहचल्यानंतर, त्यांनी शहर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. या प्रकरणी मयूर देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामचंद्र शिखरे हे करत आहेत.