⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पालिकेची पाणीपट्टी आकारणी चुकीची : शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ एप्रिल २०२३ | भुसावळ पालिका नागरीकांना वर्षभरातून केवळ 50 दिवस पाणीपुरवठा करते मात्र कर आकारणी वर्षभराची करीत असल्याने ही बाब अत्यंत चुकीची संतापजनक असल्याचा दावा भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी केला आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा अत्यंत अनियमितपणे होत असून अशुद्ध व आरोग्याला घातक पाणीपुरवठ्यामुळे नागरीक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराला लागून असलेली तापी दुथडी वाहत असताना आठ दिवसातून एकवेळा पाणीपुरवठा होण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. वास्तविक नागरीकांना जितके दिवस पाणीपुरवठा होतो तेव्हढ्याच दिवसांचे पाणी बिल आकारले पाहिजे मात्र वर्षभराची पाणीपुरवठा आकारली जात असल्याने ही तर सरळ-सरळ नागरीकांची लुबाडणूक असल्याचा आरोप दलाल यांनी केला आहे.

पाणीपुरवठ्या इतकेच बिल आकारावे
ग्राहक संरक्षण कायद्यात न दिलेल्या सेवेचे बिल/पैसे आकारता येत नाही तर दुसरीकडे मात्र नगरपालिकेनेदेखील वर्षभराचे पाणी बिल न आकारता 50 दिवसांचे पाणी बिल आकारावे अथवा प्रत्येक नळाला मीटर लावावे व मीटर रीडिंग नुसार बिल आकारावे, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेचे माजी सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा संघटक प्र.ह.दलाल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

पाणीपुरवठ्याचे सुमार नियोजन
शहरात नळाला पाणी निश्चित केव्हा, किती वाजता येईल याचेही व्यवस्थित नियोजन नाही. अनेकदा सातत्याने पाईप लाईन फुटते तर अनेकदा बिघाडही होतो त्यामुळे नागरीकांना बोअर वेलचा आधार घेत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. एव्हढे ढिसाळ नियोजन असूनही पाणीपट्टी मात्र सक्तीने वसूल करणारी हे राज्यातली ही एकमेव नगरपालिका असल्याचा दावा दलाल यांनी करीत नागरीकांनी आता आंदोलन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.