जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव रेल्वेस्थानकावर दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढताना एका महिलेचा पाय घसरला. महिला रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये पडत असताना पोलीस हवालदार दिनेश बडगुजर यांनी प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला. जिल्हा विशेष शाखेतील हवालदार दिनेश बडगुजर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.
चाळीसगाव येथील शिवशक्ती नगरात राहणाऱ्या सुनिता पांडुरंग बेडीस वय-५२ या दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याकडे जात होत्या. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून निघाल्यानंतर सुनीता बेडीस या पतीसह रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करू लागले. रेल्वेने वेग घेतलेला असल्याने सुनीता बेडीस यांचा हात निसटला आणि त्या रेल्वे व प्लॅटफार्मच्या मधील अंतरात पडू लागल्या.
जिल्हा विशेष शाखेतील हवालदार दिनेश बडगुजर हे त्याचवेळी कामानिमित्त रेल्वे स्थानकाहून निघत असताना त्यांनी घटना पाहताच प्रसंगावधान व तत्परता दाखवली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेला माघारी ओढले. दिनेश बडगुजर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सुनीता बेडीस यांचा जीव वाचला आहे. घटनेप्रसंगी रेल्वे मित्र अनिल वर्मा आणि स्टेशनवर सामान ने-आण करणारे सईद पिंजारी हे देखील त्याच ठिकाणी होते. घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक (गृह) विठ्ठल ससे हे देखील त्याठिकाणी पोहचले. आरपीएफकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून त्यांनी घटनेची खात्री केली.
हवालदार दिनेश बडगुजर यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे व धैर्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन त्यांच्या या अतिउत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक (गृह) विठ्ठल ससे व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्यांचे कौतूक करुन त्यांचा सन्मान केला आहे.
पहा तो थरारक व्हिडीओ: