सोमवार, डिसेंबर 4, 2023

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! जळगाव जिल्ह्यातील दोघे MPDA कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । जळगाव जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना एमपीडीए (MPDA) कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. प्रकाश चंद्रकांत कंजर (वय ३४, रा. खंडेराव नगर, जळगाव) व सोनू रामेश्‍वर पांडे (वय २४ रा. मामाजी टॉजीक मागे, भुसावळ) असं या दोघांचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील काही काळात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. एकंदरीत गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्हयात अनेक सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीसह एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दोन जणांना स्थानबध्द केले आहे.

यातील प्रकाश चंद्रकांत कंजर हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी ठाणे येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. यासोबत, सोनू रामेश्‍वर पांडे याच्यावर आर्म ऍक्टसह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्याला पुणे येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.

गेल्या नोव्हेंबर पासून ते आजवर जिल्ह्यातील २१ विविध गुन्हेगरांना स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेट ); वाळू तस्कर व काळा बाजार करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम सन १९८१ ( महाराष्ट्राचा कायदा क्रमांक ५५ सन १९८१ ) सुधारणा अधिनियम २०१५ अंतर्गत या कारवाया करण्यात आल्या आहेत.