घाट संपण्यापूर्वीच ट्रक दरीत कोसळला, चालक, क्लीनर दोघे ठार
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । कन्नड घाटात गुजरातकडून औरंगाबादकडे टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने, ट्रक ४०० फूट खोल दरीत कोसळला. २१ रोजी सकाळी १० वाजता हा भीषण अपघात झाला. त्यात ट्रकचालक व क्लीनर या दोघांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. दरम्यान, महामार्ग पोलिसांनी अथक परिश्रम करून दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. अपघातस्थळापासून केवळ २५ मीटर अंतर पुढे गेल्यानंतर घाट संपतो. त्यापुर्वीच दुर्दैवी अपघात झाल्याने दोघांना जिव गमवावा लागला.
ट्रक चालक शेख फयाज शेख दरबार (वय २८, रा. शेवगा, ता.जि.औरंगाबाद) व क्लीनर आसाराम अंबादास दाभाडे (वय २९, रा. मुरूमखेडा, औरंगाबाद) अशी दाेघांची नावे आहेत. ते दोघे ट्रकमध्ये (एम.एच.१८ ए.ए.७४२३) टाईल्स भरून गुजरातकडून औरंगाबादकडे जात होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा ट्रक कन्नड घाट चढत असताना, वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक ४०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभागाचे उपनिरीक्षक सुनील पवार, एएसआय अशोक चौधरी, प्रताप पाटील, योेगेश बेलदार, विरेंद्रसिंग शिसोदे, सुनील पाटील, श्रीकांत गायकवाड, कादर शेख तसेच कंत्राटदार राज पुन्शी यांचा स्टाफ बापू चौधरी, पचोरिया व परिसरातील ढाबा चालकांनी मदत केली.
३ तासांनी काढले मृतदेह
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक खोल दरीत कोसळल्याने टाईल्ससह ट्रकचा पूर्णपणे चक्काचूर झाला. पोलिसांनी ट्रक चालक व क्लीनर यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी दोरखंडाचा वापर केला. मात्र दोर अपुरे पडू लागल्याने पाेलिसांनाच जीव धाेक्यात घालून काही अंतर खाेल दरीत उतरावे लागले. मदतकार्यासाठी तीन क्रेन मागवण्यात आले होते. तब्बल तीन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर क्लीनर आसाराम याला बाहेर काढत असताना त्याचाही मृत्यू झाला. महामार्ग पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलवले.