जळगाव जिल्हा

परिवहन विभागाने वर्षभरात केला 7 कोटीपेक्षा अधिक दंड वसुल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ एप्रिल २०२३ |उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील वायुवेग पथकाद्वारे सन २०२२-२३ या कालावधीत करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतंर्गत कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटीपेक्षा जास्त दंड वसूली केली आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. कार्यालयाने सन 2022-23 या वर्षात एकूण ७ कोटी ३५ लक्ष ४० हजार इतकी दंड वसुली तर १ कोटी ३८ लक्ष इतकी कर वसूली केली असून शासनाने दिलेल्या लक्षांकाच्या १०६ टक्के कामगिरी असल्याचेही श्री. लोही यांनी म्हटले आहे.


या कालावधीत दोन्ही वायुवेग पथकामार्फत रस्त्यावर अंमलबजावणी करताना विना अनुज्ञप्ती वाहन चालविणाऱ्या २१३५, परवाना नसलेल्या ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या ३५५८, पीयुसी नसलेल्या २९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणा-या ८९८, अवैधरित्या प्रवासी वाहतुक करणा-या लक्झरी बसेस १६५ असे एकूण 10 हजार 149 वाहनांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर या पथकाच्या कारवाई अंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे ४४७१, सीट बेल्ट न वापरणे ११२५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ७२२, विमा प्रमाणपत्र नसणाऱ्या ३३३५, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ११९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या १७०, मालवाहू वाहनातून जादाभार करणाऱ्या ८७८ व लाल परावर्तक नसणा-या २२८० तसेच टपावरून मालाची वाहतूक करणा-या लक्झरी बसेस १३ अशा एकूण 14 हजार 186 इतक्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. या कालावधीत दोषी वाहनचालकाविरुध्द कारवाई करताना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मोटार वाहन निरीक्षक आर. डी. निमसे, श्रीकांत महाजन, सुनिल गुरव, धीरज पवार, दिपक ठाकूर, संदीप पाटील, हेमंत सोनवणे, चंद्रविलास जमदाडे, नितीन सुर्यवंशी, नितीन सावंत, सौरभ पाटील, प्रशांत कंकरेज, अविनाश दुसाने, गणेश पिंगळे, जगदीश गुगे, विनोद चौधरी, सुनिल ठाकूर, नितीन जठार यांनी कामकाज केले.


सन २०२२-२३ या कालावधीकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांना शासनातर्फे १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. त्यापैकी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी सन २०२२-२३ या दरम्यान एकूण १६० कोटी ९८ लक्ष महसूल वसूलीचे उदिष्ट पूर्ण केलेले असून ते लक्षांकाच्या ९२% टक्के इतके आहे. सन २०२२-२३ या दरम्यान जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात एकूण ५६ हजार ३२३ इतक्या नविन वाहनांची नोंदणी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत नविन दुचाकी वाहनांच्या नोंदणीत १०% वाढ झाली आहे. नविन हलके मोटार वाहन (कार) च्या नोंदणीमध्ये ६% ने घट झाली आहे. परंतु वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहनांच्या नोंदणीमध्ये मुख्य इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांच्या नोंदीत ३५३% ने वाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रीक कारच्या नोंदणीत सुध्दा वाढ झाली असून सन २०२२-२३ या दरम्यान २६ नविन इलेक्ट्रीक कारची नोंदणी झाली आहे.


जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर-२०२२ दरम्यान एकूण ८४३ रस्ते अपघातामध्ये एकूण ५६४ व्यक्ती मयत झाल्या असून अपघातात जखमी झालेल्यांची संख्या ७१९ इतकी आहे. परंतु जमेची बाब म्हणजे जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण अपघातांच्या संख्येत १६% ने घट झाली असून अपघात मयत व्यक्तींच्या संख्येत १५% ने घट झाल्याचे दिसून येते.


जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने दुचाकी, अवजड वाहन व मोटार कार यांचा समावेश आहे. बरेचसे अपघात हे जलद वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे व धोकादायक पध्दतीने ओव्हरटेक करणे इत्यादी कारणास्तव झाल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यातील सर्व दुचाकी व चारचाकी वाहनचालक यांनी महामार्गावर तसेच शहरात दुचाकी चालविताना न चुकता हेल्मेट परिधान करावे, सर्व वाहन चालकांनी महामार्गावरील विहित केलेल्या वेग मर्यादेमध्ये वाहन चालवावे. लेन बदलवितांना व ओव्हरटेक करतांना विशेष काळजी घ्यावी. पादचारी रस्त्यांवरुन महामार्गावर येतांना महामार्गावरील वाहनांना प्राधान्य देवूनच प्रवेश करावा. वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे टाळावे. दुचाकीवर दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करू नये, पालकांनी अनुज्ञप्ती खेरीज पाल्यांना दुचाकी चालविण्यास मज्जाव करावा. कार चालकानी व प्रवाशांनी सिटबेल्टचा वापर करावा. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनाचे वेळोवेळी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे. खाजगी प्रवासी बस चालकांनी त्यांच्या वाहनातून मालाची वाहतूक करु नये. प्रवासी वाहतूक करणा-या वाहन चालकांनी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये. असे आवाहनही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Back to top button