जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२३ । ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. मागील काही दिवसापूर्वी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा रब्बी पिकांसाठी फायदा होईल. दरम्यान, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांत ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तवली होती; परंतु हवेची दिशा बदलल्यामुळे या तिन्ही जिल्ह्यात पाऊस पडला नाही.

जळगाव जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस देखील झालेला नाही. १३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पहाटेच्या वेळेत थंडीचा जोर वाढेल. किमान तापमान १५ ते १८ डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मात्र, कमाल तापमान काही प्रमाणात ३३ ते ३५ डिग्री दरम्यान राहील. २० नोव्हेंबरपर्यंत तापमान अशाचप्रकारे राहणार आहे. यानंतर काही प्रमाणात तापमान वाढू शकते.

पुन्हा पावसाचा अंदाज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गोवा, केरळ, तामिळनाडूसह राजधानी दिल्लीमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी हवेतील आद्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे येत्या २४ तासांत कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.








