⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातून शिक्षकास जमावाने बेदम मारहाण करून दिली धमकी

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ऑगस्ट २०२३। शहरातील वरणगाव रस्त्यावरील संभाजीनगर, एजीसी इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात शुक्रवारी सकाळी अकराला शाळेतील पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून विद्यार्थिनीचे नातेवाइकांसह तीन ते चार जणांच्या टोळक्याने शाळेतील शिक्षक आशिष लता साहोत (रा. संभाजीनगर, भुसावळ) यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, त्यानंतर या टोळक्याने शंभर, दीडशे जणांचा जमाव पोलिस ठाण्यात आणून शिक्षकासह घेरले व मारहाण केली. पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थिनीचे नातेवाईक संशयित किशोर सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, छोटू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी व दोन ते तीन अनोळखी जणांनी मारहाण केल्याची फिर्याद देण्यासाठी शिक्षक आशिष लता साहोत हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता संशयितांसह शंभर ते दीडशे जणांचा जमाव त्या ठिकाणी चालून आला.

त्यांनी शिक्षकाला पोलिस ठाण्यात सुद्धा मारहाण केली. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा धक्काबुक्की केली. या दरम्यान काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सरळ पोलिस ठाण्याबाहेर पळ काढला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव जमून त्यांनी धुडगूस घातला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.