जिल्ह्यातील शिंदे गटाला अखेर आली जाग : कार्यकारणीची होणार अधिकृत घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । राज्यात झालेल्या सत्तांतरानंर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यात दोन गट निर्माण झाले आहेत. तब्बल पाच महिन्यांनी शिवसेना शिंदे गटाची जिल्ह्याची कार्यकारणी तयार झाली आहे. आगामी दोन दिवसात या कार्यकारणीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

आगामी जि.प., नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका पाहता शिंदेगटाकडून आता संघटना वाढीवर भर दिला जाणार आहे. राज्यात जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकीकडे जिल्ह्यात शिंदे गटाचे पाच आमदार आहेत.यामुळे गटाला लवकर ग्रीप मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेच्या जुन्या संकल्पेप्रमाणेच शिवसेना शिंदे गटाचीही संघटनात्मक बांधणी राहणार असून, जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात २ व रावेर लोकसभा मतदारसंघात २ जिल्हाप्रमुखांचा समावेश राहणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात तालुकाप्रमुख व जळगाव शहरासाठी महानगरप्रमुख अशी नियुक्ती केली जाणार आहे. यासह महिला आघाडीच्याही नियुक्त्या केल्या जाणार आहे.

जळगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाचे संघटन कमी असून, हे संघटन वाढवण्यासाठी जळगाव शहराची जंबो कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. यामध्ये महानगरप्रमुख म्हणून निलेश पाटील यांची निवड जवळपास निश्चित असून, जिल्हाप्रमुख म्हणून माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची नियुक्ती होवू शकते. यासह आमदार किशोर पाटील यांनाही पक्षाकडून जिल्हाप्रमुखपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर जळगाव ग्रामीणमधून एका पदाधिकायाची निवड जिल्हाप्रमुख म्हणून होणार असल्याची चर्चा आहे. यादी मुंबईला पाठविण्यात आली असून, मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर शिदे गटाची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे.