वडोदा वनक्षेत्रातील पावरी वाड्याची वस्ती वन क्षेत्रातच

मार्च 31, 2022 11:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वडोदा वनविभागाच्या हद्दीतील शेतीलगत सुमारे पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून येथे वसलेल्या पावरी वाड्याची मोजणी प्रक्रिया अखेर २९ रोजी पार पडली. डोलारखेडा, नांदवेल दरम्यान शेती-शिवारालगत जंगलात वनविभागाच्या हद्दीत वसलेल्या पावरी वाड्याचा भूमिअभिलेख व वनविभाग यांच्या सयुक्त विद्यमाने क्षेत्र मोजणी करण्यात आली. दरम्यान या ठिकाणी वसलेली पावरी समाजाची वस्ती ही वनहद्दीत असल्याचे मोजणीअंती निष्पन्न झाले असून वस्ती तात्काळ खाली करून जागा मोकळी करण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

van shetra jpg webp

व्याघ्र अधिवास क्षेत्र वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा वनपरीमंडळातील दक्षिण डोलारखेडा नियत क्षेत्रालगतच्या शेतीची मोजणी करण्यात आली असून पावरी लोकांची वसलेल्या मानवी वस्तीचे भूमापन करण्यात आले. गत काही वर्षापुर्वी मध्य प्रदेश येथील पावरी समाजबांधवाने नांदवेल शिवारात शेतजमीन विकत घेऊन त्याच्या नात्यागोत्यातील वीस-बावीस कुटुंबियांसह येथे बस्तान बसविले आहे. परंतु सदर वस्ती शेतीत नसून वनविभागाच्या वनहद्दीत अतिक्रमित असल्याची तक्रार येथील जि.प.सदस्य निलेश पाटील यांच्यासह काही स्थानिकांनी वनविभागाकडे सन २०१७ मध्ये केली होती. तसेच वेळोवेळी याबाबत पाठपुरावा सुरु ठेवला. परंतु सदर वस्ती नेमकी वनविभागात आहे की शेतीमध्ये आहे? याबाबत वनविभागालाही सांशकता होती. त्या अनुषंगाने वनविभागाची कारवाई सुरु होती. अखेर २९ मार्च रोजी संबंधित ठिकाणी मोजणी करण्यात येऊन वनहद्द व शेतीहद्द निश्चित करण्यात आली. जि.प.सदस्य निलेश पाटील यांच्या तक्रारीप्रमाणे सदर मानवी वस्ती वनविभागाच्या हद्दीतच असल्याचे सिद्ध झाले असुन वनविभागाकडुन अतिक्रमणधारकांना तात्काळ जागा मोकळी करण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत अतिक्रमण स्वत:हुन मोकळे न केल्यास वनविभागाकडुन कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

वनविभागाचे भू-मोजणी अधिकारी ए.बी.चव्हाण, एन.एन.वाघ, भूमिअभिलेखचे गोकुळ चव्हाण, विनोद ठाकरे यांनी काम पाहीले. या प्रसंगी जळगांव वनविभागाचे उपसाहाय्यक उपवनसरंक्षक उमेश बिराजदार, प्रभारी वनक्षेत्रपाल ए.आर.बच्छाव, वनपाल पी. टी. पाटील, महीला वनपाल मराठे, महीला वनपाल वंदना कोळी, महिला वनरक्षक एस.पी.देवरे, दिपाली बेलदार, वनरक्षक जी.बी. गोसावी, वनरक्षक बी.बी. थोरात व वनमजुर यावेळी उपस्थित होते. मोजणीवेळी कोणताही वाद न होता शांततेत मोजणी करण्यात आली व हद्दखुणा ठरवुन देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now