आदिवासी भगिनींची संघर्ष करण्याची भुमिका महान : खा.शरद पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाला मी जात होतो. लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने दिल्ली येथील आंदोलनात १२०० पेक्षा जास्त भगिनी त्याठिकाणी होत्या. दुर्दैवाने सीताबाई या भगिनींचे दुःखद निधन झाले, त्यामुळे इतर भगिनी अस्वस्थ झाल्या परंतु त्यांनी मैदान सोडले नाही. आपल्या प्रश्नासाठी संघर्ष करण्याची भूमिका तुमची असल्याने मी तुमचे अभिनंदन करतो. आज शेतीचे प्रश्न, उतारा नावावर करून देणे, नियमांची गावात अंमलबजावणी होत नाही असे प्रश्न प्रलंबित असल्याचे प्रतिपादन खा.शरद पवार यांनी केले.
‘शहरातील जी.एस ग्राउंड वर आयोजित लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढे त्यांनी सांगितले की, जल, जंगल, जमीन यावर तुमचा अधिकार आहे, परंतु त्यात अनेक ठिकाणी सातबाऱ्यावर उल्लेख नाही. त्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे तुमच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार आहोत. आजच्या परिषदेत मांडलेले ठराव आणि भाषणात आलेले मुद्दे याविषयी धोरण ठरविण्यासाठी येत्या ३-४ तारखेला संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेऊ. काही ठिकाणी मी स्वतः प्रतिभा शिंदे यांच्यासोबत फिरून निर्णय घेईल. राज्य सरकारची सर्व शक्ती वापरून आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे हि खा.शरद पवार यांनी सांगितले.