महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आताची सर्वात मोठी बातमी!
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । गेल्या अनेक महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा तिढा अखेर उद्या मिटणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्याच निकाल देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी या प्रकरणावर निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत कुणाचा जय होणार, यामुळे उत्सुकता वाढली आहे.
शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह केलेल्या बंडामुळे ठाकरे यांचं सरकार कोसळून नवं सरकार अस्तित्वात आलं होतं. मात्र शिवसेनेतील फूट आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेचं प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. या प्रकरणात अनेक महिने सुनावणी झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला असून याबाबत उद्या म्हणजेच 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार असल्याची माहिती समोर येत आहे.