⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

उद्धव ठाकरेंना शिंदेंचा धक्का : मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची होणार चौकशी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग म्हणजेच (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यामुळे शिंदे-फडणवीस यांनी ठाकरेंना धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

विधीमंडळ अधिवेशनात मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. कोरोना काळात मुंबई महापालिकेत भष्ट्राचार झाल्याचा आरोप भाजपने नेहेमीच केला आहे.मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून घेण्यासाठी शिंदे-फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. ठाकरे गटाला पुन्हा झटका देण्याच्या तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली असल्याचे दिसते.

कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. त्यामुळे या आरोपतील सत्यता जनतेसमोर यावी यासाठी लवकरात लवकर कॅगमार्फत या सर्व प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने कॅगला दिले आहेत.