जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । मागील १५ ते २० दिवसाच्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केलं असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान रावेर तालुक्यातील बक्षिपूर गावातील जूनी संरक्षण भिंत नागझिरी नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळली. या घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी आज महसूल विभागाच्या अधिकारीवर्गाने केली.

या पाहणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सौ. अर्चना मोरे, प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर श्री. निवृत्ती गायकवाड, रावेरचे तहसीलदार श्री. बंडू कापसे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. रावळ उपस्थित होते.

नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतल्यानंतर पुढील आवश्यक ती उपाययोजना व मदत तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या.











