विधानसभा निवडणूक : आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२४ । राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आजपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अकराही मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने अर्ज भरण्यासाठीची यंत्रणा सज्ज केलेली आहे.
आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे. २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असेल. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात भाजपने विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर इतर पक्ष व आघाड्यांचे उमेदवार अद्याप जाहीर होणे बाकी आहेत. असे असले तरी अनेक इच्छूकांनी उमेदवारी अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आज केली आहे. महापालिका, तहसील कार्यालय आदी ठिकाणी कागदपत्रांसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
थकबाकी असेल तर अर्ज बाद!
उमेदवाराला निवडणूक लढविण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास व त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जाणार आहे.
बँकांतही गर्दी
निवडणुकीसाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्जासोबत बँकेच्या पासबुकची छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज अनेक राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना नामांकन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात फक्त पाचच व्यक्तींना प्रवेश करता येणार आहे.
अर्ज तपासणीसाठी सात स्वतंत्र कक्ष
जळगाव शहर मतदारसंघासाठी जळगाव तहसील कार्यालय हे निवडणूक कार्यालय असणार आहे. तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी सात स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहेत. त्यात अर्ज तपासणी कक्ष, कागदपत्रे तपासणी कक्ष, अनामत रक्कम जमा करणे कक्ष इतर माहितीचे कक्ष आहेत. उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी या कक्षातून आपले अर्ज तपासून घ्यावेत. जेणे करून आपला उमेदवारी अर्ज बिनचूक असेल तो अवैध ठरणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.