⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

‘व्हॅलेंटाईन डे’ला पोलिसांची मध्यस्थी अन् प्रेमीयुगलाच्या लव्हस्टोरीला सुखद वळण…

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । प्रेमीयुगलांचे वृत्त अनेकांना वाचायला आवडते. असेच एक वृत्त जामनेर तालुक्यात समोर आले आहे, वडाळी येथील मुलगा आणि ढालगाव येथील मुलगी हे प्रेमीयुगल मागील चार दिवसांपासून पळून गेले होते. ते सोमवारी थेट पहूर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या संमतीने त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न लावले. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर लग्नाचा बार उडाला.

वडाळी येथील अमीन गंभीर तडवी (वय २१) व ढालगाव येथील इरशाद जब्बार तडवी (वय २१) यांचे एकमेकांवर प्रेम होते. घरातील मंडळी लग्नाला विरोध करतील म्हणून दोघांनी गुरुवारी (दि.१०) पळून जात थेट अहमदाबाद गाठले. नंतर सोमवारी (दि.१४) दोघे पहूर पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी त्यांची समजूत काढली, परंतु प्रेमीयुगलाने आमचे लग्न लावून देण्याची विनंती केली. त्यामुळे इंगळे यांनी दोघांच्याही नातेवाईकांना बोलावून माहिती दिली. यावेळी जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, पहूरपेठचे उपसरपंच शाम सावळे, वडाळीचे माजी सरपंच सुधाकर पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दोघांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पोलिस ठाण्यात त्यांचे लग्न लागले.

हे देखील वाचा :