⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

जळगावात घरफोडीमधील चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२४ । जळगाव शहरातील समता नगरामधील प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय-४०) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला होता. याबाबत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश श्रावण सुरवाडे (वय-१८) व दीपक सुभाष भांडारकर (वय-२१) दोन्ही रा. समतानगर असे अटकेतील आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत करण्यात आली.

नेमकी घटना काय?
समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय-४०) या शनिवारी ६ जानेवारी रोजी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. प्रतिभा बनसोडे या घरी आल्या, त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीसंदर्भात प्रभारी अधिकारी विठ्ठल पाटील यांनी सूत्रे फिरविली व त्यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, पोकॉ रवींद्र चौधरी यांनी रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समता नगरातून दोन्‍ही संशयित आरोपी प्रकाश सुरवाडे व दीपक भांडारकर यांना अटक केली. त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित मुद्देमालाविषयी तपास सुरू आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहेत.