जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरटयांनी धमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दरम्यान भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करत घरातून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीतील चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

सोमवारी १० फेब्रुवारी रोजी फिर्यादी इब्राहिम इस्माईल बागवान (वय वर्ष), रा. मुंजोबा मंदिर, पाटील मळा, भुसावळ यांच्या घरी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूम व किचनमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून १ लाख ७२ हजार ५०० किमतीचा ऐवज चोरून नेला. यात २८ हजार रुपये रोख आणि १७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीबाबत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी रिजवान फकीरा बागवान, रा. जाम मोहल्ला, भुसावळ याला अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ५०० मुद्देमाल हस्तगत केला, ज्यात रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.