Jalgaon : त्याने प्लॅन केला, पण.. ; फिर्यादीच अडकला पोलिसांच्या जाळ्यात, बातमी काय वाचा?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । मध्य प्रदेशातील खंडवा येथे पाइप पोहोचवून वसूल केलेल्या रकमेपैकी ६४ हजार रुपये पत्त्याच्या डावात हरल्याने चालकाने मालवाहू वाहनातून रोकड चोरीचा बनाव केला. पोलिसांच्या तपासात हा फिर्यादी चालकच अडकला असून, नशिराबाद पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (२३ जून) रोजी मन्यारखेडा फाट्याजवळ घडला. संशयिताला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
जळगाव येथून मालवाहू वाहनामध्ये पाइप घेऊन राहुल काशिनाथ कोळी (३०, रा. कांचन नगर) हा चालक खंडवा येथे गेला होता. तेथून त्याच्याकडे पाइपची रक्कमही देण्यात आली. परत येत असताना मन्यारखेडा फाट्यापासून अर्धा कि. मी. पुढे एमआयडीसी रस्त्यावर दुचाकी समोर आल्याने मालवाहू वाहन (एमएच १९सीवाय ७६८८) हे २२ जून रोजी रात्री ११ वाजता रस्त्याच्या कडेला खड्यात उतरले. त्यामुळे तेथेच झोपलो. मात्र वाहनात ठेवलेली दोन लाख १४ हजार रुपयांची रोकड चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद राहुल कोळी याने नशिराबाद पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून २३ जून रोजी, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
घटनेचा तपास करत असताना फिर्यादी राहुल कोळी खंडवा येथून रक्कम घेऊन जळगावात आला होता. याबाबतच्या चौकशीत त्याने पत्त्याच्या डावात ६४ हजार रुपये हारल्याचे सांगितले. त्याने वाहनासमोर दुचाकी आल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिस चौकशीत त्याने याची कबुली दिली. तपास पोहेकों प्रमोद पाटील करीत आहेत.