जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस होत आहे. या पावसात जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एकीकडे शहरात साफसफाईचे दावे केले जात असताना, दुसरीकडे शहरातील विविध भागातील गटारी ओव्हरफ्लो होत असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
अनेकवेळा काही काळ धुवाधार पाऊस पडतो आणि नंतर निघून जातो. मात्र पाऊस संपल्यानंतर हे पाणी गटारीतून काही वेळेत वाहून जायला हवे ते तीन- चार तास जात नाही. कारण गटारींमध्ये इतकी घाण वाढली आहे की, सांगायलाच नको मनपाकडून एकीकडे प्लास्टिक बंदीचे दावे केले जात असताना, प्लास्टिकचाच कचरा त्यामुळे वाढला आहे. यामुळे नक्की कारवाई झाली की नाही ? असा प्रश्न उपस्थित करावासा लागत आहे.
शहरातील गटारींची सफाई व्यवस्थित केली जात नसल्याचेच शहरात दिसून आले. मनपाकडून मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नाले व गटारी सफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येत असते. मात्र, मनपाची ही मोहीम केवळ नावालाच ठरलेली दिसते. एकीकडे रस्त्यांची समस्या कायम असताना, नागरीकांना या सांडपाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
स्टेडीयम कॉम्प्लेक्ससमोर तळे साचण्याची समस्या कायम आहे. या ठिकाणी गटारीत कचरा टाकला जात असल्याने गटार तुंबते. मनपाकडूनही व्यवस्थित साफसफाई होत नसल्याने थोड्याश्या पावसातही तळे साठते. नवीपेठ भागातील जुनी सरस्वती डेअरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नेहमी है पाणी एका गल्लीपुरतेच असते. मात्र, रविवारी टॉवरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत साचले होते. शाहू नगरातील ताज पान सेंटर परिसरातील सर्वच गटारी तुंबल्याने या भागातील घरांच्या दारापर्यंत पाणी साचते . या भागातील रहिवाशांना पायी चालण्यासाठी देखील जागा शिल्लक राहत नाही.