शासनाच्या निर्णयानुसार तपासणी; अधिकाऱ्यांची कमालीची गुप्तता;
Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनुदानित आश्रम शाळेत शुक्रवारी (ता.१४) सकाळी ९.३० वाजता प्रांताधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांच्या ताफ्याने अचानक भेट देऊन तपासणी सुरू केली. यावेळी पत्रकार माहिती संकलन करण्यासाठी गेले असता त्यांना उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी करतांनाचे छायाचित्रे काढण्यास मनाई केली व आम्ही शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आश्रम शाळांची तपासणी करीत असल्याचे सांगितले.
धानोरा ता.चोपडा येथील अनुदानित आश्रम शाळेत प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षक कशा प्रकारे शिकवतात,विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था आरोग्य अशी पाहणी उपस्थित अधिकाऱ्यांनी केली. तपासणी दरम्यान शाळेत पटसंख्या पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळून आली असल्याचे समजते. परंतु तपासणी नंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी अहवालात कमालीची गुप्तता बाळगून हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असून आपण तो शासनाकडूनच मिळेल असे पत्रकारांना सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली. यावेळी प्रांत अधिकारी सीमा अहिरे, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, तहसीलदार अनिल गावित, गट शिक्षण अधिकारी भावना भोसले, पीडब्ल्यूडीचे प्रमोद सुशिर, मंडळ अधिकारी आर आर महाजन, तलाठी सरवर तडवी बिडगाव, व्ही डी पाटील पंचक, खुशबू तडवी धानोरा, आदी उपस्थित होते.
शाळेचा कारभारी कोण?
धानोरा येथील आश्रम शाळेचा कारभार कोण पाहत आहे याबाबत पत्रकारांनी यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना विचारले असता माझ्याकडे सुद्धा याबाबत काहीएक माहिती नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे आदिवासी आश्रम शाळेचा कारभारी कोण याबाबत शासनाचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला.
अहवालाची गुप्तता
शासनाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या आश्रम शाळेच्या तपासणीत पटसंख्या पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळून आली असून देखील उपस्थित अधिकाऱ्यांनी शाळेत केलेल्या तपासणीच्या माहितीचा अहवालात काय नमूद केले असे पत्रकारांनी विचारले असता अधिकाऱ्यांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळत माहिती देण्यास टाळाटाळ केली.