जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । आम्ही विरोधात आहोत, म्हणून आमची विकासकामे होत नाहीत का? असं म्हणत भाजप आमदार संजय सावकारे यांनी जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना चिमटा काढला. त्यावर गुलाबरावांनी भाजप सरकारच्या काळातही हीच परिस्थिती होती, असं म्हणत सावकारे यांना उलटा टोला लगावला. त्यावर सावकारे यांनी त्या सरकारमध्ये तुम्हीही सहभागी होतात, असं प्रत्युत्तर देताच एकच हशा पिकला. ‘सांभाळून घ्या आपलं सरकार आहे’ अशी विनंती केली. शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी या दोघांच्या संवादावर ‘सरकार कोणाचेही असो, मात्र महावितरण विभागाला त्याचा फरक पडत नाही’ असे सांगत महावितरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
भाजपा आमदार संजय सावकारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्ती किंबहुना खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या तोंडावर सावकारे यांचे मत एकनाथ खडसेंनाच मिळणार असे म्हटले जात असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सावकारे यांना मारलेला टोला अतिशय महत्त्वाचा म्हटला जात आहे. मात्र, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श असून आजही मी त्यांना मानतो. परंतु पक्ष सांगेल त्यांना मी मतदान करेन असे सावकारे यांचे मत आहे. असं जरी असल तरी यामुळे आता पुढे काय होत याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
भुसावळ तालुक्यात महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरची असो किंवा इतर कामे रखडलेली आहेत. अनेकदा सूचना-तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही. याला अनुसरून आमदार संजय सावकारे यांनी ‘आम्ही विरोधात आहोत म्हणून आमची विकास कामे होत नाहीत का?’ असा सवाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारला. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे उत्तर फार बोलके होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची उपस्थिती होती. तर या बैठकीसाठी जिल्हातील सर्व आमदार, सर्व विभागांचे विभाग प्रमुख तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.