⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | ‘ते’ बोल ठरले अखेरचे, उद्योजक होण्यापूर्वीच मनोजला काळाने गाठले

‘ते’ बोल ठरले अखेरचे, उद्योजक होण्यापूर्वीच मनोजला काळाने गाठले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । शिक्षण घेण्याच्या वयात शिक्षणासोबतच मेहनत करून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या मनोज महाले या विद्यार्थ्यांचा काळाने घात केल्याची घटना बुधवारी घडली. सकाळीच काकांसोबत दुचाकीने जात असताना मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन मोठा उद्योजक होण्याचे स्वप्न असल्याचे त्याने बोलून दाखविले होते. अपघातात मनोजला जीव गमवावा लागला असून त्याचे ते शब्द अखेरचे ठरले आहेत. आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या प्लॅटीना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील मनोज महाले (वय २०) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी शासकीय आयटीआयजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.

नाचनखेडा येथील अजाबसिंग भिमसिंग महाले यांची दोन मुले व एक मुलगी शिक्षण घेत आहे. त्यांचा मोठा मुलगा मनोज महाले (वय २०), हा भडगाव येथील आबासो दत्ता पवार खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री ट्रेडचे प्रशिक्षण घेत होता. मनोज हा काका कुवरसिंग भिमसिंग महाले यांच्याकडे (रा.चिंतामणी कॉलनी, पाचोरा) राहत होता. आयटीआयच्या शिक्षणासाठी तो दररोज अरमानखान रमजानखान (रा.अंतुर्ली बुद्रूक, ता.पाचोरा) या मित्राच्या दुचाकी क्रमांक एम.एच.१९-डी.एस.६९९७ ने पाचोरा ते भडगाव मित्रांसोबत अपडाऊन करीत होता.

बुधवारी देखील सकाळी ८ वाजेच्या सुमारास मनोज व त्याचा मित्र अरमानखान हे दोघे दुचाकीने भडगावकडे निघाले होते. वाटेत तितूर नदीच्या पुलाच्या पुढील वळणावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. या अपघातात मनोज यास डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी एका बाजूने पूर्णपणे चक्काचूर झाली. दोघा विद्यार्थ्यांना नागरिकांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासून मनोजला मृत घोषीत केले. तर अरमानखान याला प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्वप्नांची झाली राखरांगोळी

भविष्यात मोठा उद्योग उभारण्याचा मानस मनोजने आपल्या काकांकडे अनेकदा बोलून दाखवला होता. बुधवारी सकाळीदेखील घरातून निघताना तो काकांसोबत दुचाकीवर बाहेर पडला होता. काही अंतरापर्यंत त्याला काकांनी सोडले. तेथून पुढे तो मित्राच्या दुचाकीवर जात होता. वाटेत त्याने काकांना उद्योजक होण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगितले होते. मात्र, ते त्याचे अखेरचे बोल ठरले. हरहुन्नरी मनोजचा अपघाती मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा ठरला. त्यामुळे हळहळ व्यक्त झाली.

सायंकाळी दूध विक्रीतून कुटुंबाला हातभार

मनोजच्या काकांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे मनोजदेखील दररोज सायंकाळी पूर्ती चौकात दुध विक्री करून काकांना हातभार लावत होता. तो दिवसाला ४० ते ५० लिटर दुधाची विक्री करत असे. मनमिळाऊ स्वभावामुळे मनोजने अनेक ग्राहक जोडले होते. त्यांना देखील या घटनेमुळे मोठा धक्का बसला. मनोज याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध मृताचे चुलत काका प्रकाश श्रीपत महाले (वय ६६, रा.नाचनखेडा, ह.मु.चिंतामनी कॉलनी, पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून, भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.

अभ्यासत हुशार मनोजच्या जाण्याने हळहळ

मनोज हा अभ्यासात हुशार व गुणी विद्यार्थी होता, अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. पुढील काळात वायरमन म्हणून त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल, कुटुंबाला त्याचा हातभार लागेल, असे कुटुंबियांचे स्वप्न होते. मात्र, अपघातामुळे कुटुंबियांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. या घटनेमुळे मनोजच्या मित्रांना देखील मोठा धक्का बसला. भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून, नाचनखेडा येथे बुधवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यविधी झाला. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा :

    author avatar
    टीम जळगाव लाईव्ह