जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहरात नेहमीच अपघातात कुणाला तरी जीव गमवावा लागत असतो. अपघात झाल्यानंतर बघ्याची भूमिका घेणारे आणि मोबाईलमध्ये फोटो काढणारे बरेच असतात परंतु मदतीसाठी धावणारे मोजकेच असतात. सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ एका भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार बाप-लेकीला उडविले आणि पळ काढला. नेमके त्याचवेळी तिथून जात असलेल्या पत्रकारांनी अपघात पाहिला आणि कोणताही विचार न करता चिमुकलीला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जळगाव शहरातील वाघ नगर परिसरात राहणारे राजाराम गुंजामे (वय-४०) हे मुलगी नेहा (वय-७ वर्ष) हिच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच.१९.एस.०१४० ने शहराकडे येत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील स्केटिंग प्रशिक्षण मैदानसमोर त्यांच्या दुचाकीला एका विना क्रमांकाच्या चारचाकीने धडक दिली. अपघातात दोन्ही बाप लेक रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. दोन्ही चारचाकी खाली आले मात्र सुदैवाने चारचाकी त्यांच्या अंगावरून गेली नाही. अपघात घडताच भरधाव वेगात चारचाकी चालकाने पळ काढला.
अपघात घडला तेव्हा जळगाव लाईव्ह न्यूजच पत्रकार वसीम खान हे शाहरुख सय्यद यांच्यासह दुचाकीने ठिकाणाहून जात होते. कोणताही विचार न करता त्यांनी लागलीच धाव घेत चिमुकलीला दुचाकीवर घेत जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. वसीम खान यांनी अपघाताबाबत आपले सहकारी पत्रकार चेतन वाणी यांना जिल्हा रुग्णालयात येण्याबाबत कळविले. तिघे जिल्हा रुग्णालयात पोहचताच तात्काळ केसपेपर काढून दोन्ही बाप लेकीवर उपचारासाठी डॉक्टरांची भेट घेतली.
चिमुकलीला गंभीर दुखापत झाली होती त्यात ती वडील कुठे असल्याचे विचारत असल्याने तिला धीर देत वैद्यकीय उपचार सुरू करण्यास सांगितले. जखमी राजाराम गुंजामे यांना देखील काही सहकाऱ्यांनी रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आणले. ते बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांच्या खिशातून मोबाईल काढत काही मित्र परिवार आणि कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. जवळपास तासाभराने चिमुकलीची आई रुग्णालयात पोहचली. पत्रकारांनी अपघाताबाबत जिल्हापेठ पोलिसांना देखील माहिती दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालय बाहेर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळ आणि मुख्य रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज काढून कारचा शोध घेतला परंतु चालक मिळून आला नाही. कार नवीनच असून तिच्या दोन्ही बाजूला क्रमांक टाकण्यात आलेला नाही. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारचा आणि चालकाचा शोध सुरू केला असून लवकरच तो सापडेल अशी शक्यता आहे. आज अपघातानंतर पत्रकारांनी वेळीच धाव घेतली नसती तर कदाचित दोघांना आपला जीव गमवावा लागला असता. देव तारी त्याला कोण मारी या नुसार पत्रकार देवदूत म्हणून धावून आल्याने नागरिक आणि नातेवाईक आभार व्यक्त करीत होते.