⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

पती मंदिरात तर घरात शाॅक लागल्याने पत्नीचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । पाणी तापवण्याच्या हिटरचा शॉक लागल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुषमा प्रकाश महाजन (वय ५०, रा. योगेश्वर नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ९ वाजता घडली.

घटना अशी की, शहरात एका हॉटेलमध्ये काम करणारे प्रकाश महाजन यांचे कुटुंब योगेश्वर नगरात राहते. रविवारी सकाळी प्रकाश महाजन हे मंदिरात दर्शनासाठी गेले. यांनतर त्यांच्या पत्नी सुषमा यांनी बादलीत हिटर टाकून पाणी तापवण्यासाठी ठेवले होते. पाणी गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी बादलीला हात लावताच जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना कळताच कुटुंबीयांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तत्पुर्वी त्यांचा मृत्यू झालेला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेने महाजन कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. मृत सुषमा महाजन यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.