जळगाव लाईव्ह न्यूज । ‘आयपीएस व्हायचे आहे. आता मी काहीतरी मोठी नोकरी करूनच घरी परत येईल, घरचे लोक मला शिकू देत नाही, मला शिकून मोठे व्हायचे आहे’, असा मेसेज करून एक मुलगी हाॅस्टेलमधून निघून गेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील ही १७ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी सध्या जळगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील हाॅस्टेलमध्ये राहत होती. सदर हॉस्टेल जयंत माधव राणे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. या तरुणीने २८ रोजी आई-वडिलांना व्हाॅट्सअॅपवरून एक व्हाॅइस मेसेज केला आहे. यात तिने ‘शिकून मोठे होण्याचे’ स्वप्न बोलून दाखवले. तसेच मला शिकू देत नाहीत अशी खंतही व्यक्त केली आहे.
मेसेज मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. हाॅस्टेलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ही मुलगी कोणासही काही सांगून गेलेली नाही. हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समोर आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहे.