खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळताच लावला दोघांचा गेम ; एक ठार, दुसरा गंभीर
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या नशिराबाद येथील उड्डाण पुलाजवळ सायंकाळच्या सुमारास भर रस्त्यावर दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात गोळीबार व चॉपरने भोसकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हा हल्ला पूर्व वैमन्यस्यातून झाल्याची माहिती मिळत आहे.
धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर वय-२० रा.पंचशील नगर भुसावळ हा वडिल मनोहर सुरडकर यांच्यासह जळगाव येथून भुसावळ येथे दुचाकी क्रमांक एमएच.१९.एव्ही.९६५६ ने जात होय. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील सूनसगाव रस्त्यालगतच्या उड्डाण पुलाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यात धम्म सुरडकर हा जागीच ठार झाला आहे. तर सोबत असलेले वडील मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान, हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण मयत धम्म हा आज सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटून घरी जात असताना ही घटना घडली आहे. गेल्या ११ महिन्यांपासून मयत धम्म सुरडकर हा कारागृहात होता. विशेष म्हणजे धम्म याचा उद्या दि.२२ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, भुसावळ विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
संशयीत आरोपी नशिराबाद पोलिसात जमा झाले आहे.