लक्ष्मीचे डोहाळे जेवण करीत देवरे परिवाराने जोपासली भूतदया

जळगावच्या भजनी मंडळाने आणली रंगत : समाजाला दिला गो रक्षणाचा संदेश

Erandol News । जळगाव लाईव्ह न्यूज । गोमातेचे रक्षण व्हावे हा संदेश समाजापुढे देण्यासाठी शहरातील देवरे परीवाराने गायीच्या डोहाळे जेवणाचा आगळा-वेगळा सोहळा रविवार, ४ डिसेंबर रोजी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सुवासिनींना निमंत्रीत करण्यात आले तर जळगावहून खास भजनी मंडळाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘लक्ष्मी’च्या डोहाळे जेवणासाठी हिरवी साडी, फुलांचा हार, पाच फळे आणि ओटी आणण्यात आली. अगदी थाटामाटात झालेल्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाने ‘लक्ष्मी’ अर्थात गायही तृप्त झाली.

‘गो’ रक्षणाचा दिला संदेश
एरंडोल शहरातील शेतकरी दिनानाथ रामदास देवरे व त्यांच्या परीवाराने गो मातेचे रक्षण होण्यासाठी ‘लक्ष्मी’ या गायीचा ओटीभरण सोहळा करण्याचा संकल्प केला. देवरे यांच्या भगिनी रत्नाबाई देवरे यांच्या संकल्पनेतून सूचलेल्या या सोहळ्यासाठी जळगावच्या आदर्श भजनी मंडळालाही आमंत्रीत करण्यात आले. प्रत्येक शेतकरी त्याच्याकडील प्रत्येक पशूधनाला त्याच्या घरातील सदस्याप्रमाणेच वागवतो. त्यातही प्रामुख्याने गायीला प्रत्येक शेतकर्‍याच्या घरात विशेष स्थान असल्याने एरंडोलच्या देवरे परीवारानेही वर्षभरापूर्वीच कुटुंबात दाखल झालेल्या ‘लक्ष्मी’ या गायीचे मायेने संगोपन केले आहे त्यामुळे या गायीच्या डोहाळे जेवण सोहळ्यातून गो रक्षणाचा संदेश देण्यात आल्याने या सोहळ्याची जिल्ह्यासह सर्वत्र चर्चा होत आहे.

डोहाळे जेवणाचा कौतुक सोहळा
गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी सुवासिनींची मोठी गर्दी झाली होती. देवरे परीवाराने पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला. एखाद्या कुटुंबामध्ये नवीन पाहुणा (बाळ) येणार आहे म्हटलं की कुटूंबाच्या आनंदाला पारावर उरत नाही त्याप्रमाणे एरंडोलच्या देवरे परीवारातही लक्ष्मीच्या डोहाळे जेवणानंतर आनंदाला पारावर उरलेला नाही.

‘लक्ष्मी’ डोहाळे जेवणातून गो रक्षणाचा संदेश
देवरे कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी ही गाय विकत आणली असून गो मातेचे महत्व वाढावे, गो रक्षण व्हावे यासाठीच त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. ‘लक्ष्मी’ गाय गेल्या सात महिन्यांपासून गरोदर असल्याने कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे शिवाय तितक्याच लाडाने तिचे संगोपनही केले जात आहे. समाजामध्ये गायीवरील श्रद्धा वाढायला हवी, गायींचे आपल्या जीवनातील स्थान वाढावे तसेच पशुधनावर प्रेम करायला हवे या ठेवण्यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.

भजनी मंडळाने आणली कार्यक्रमात रंगत
‘लक्ष्मी’ च्या डोहाळे जेवणासाठी जळगाव येथील आदर्श भजनी मंडळाला विशेष निमंत्रीत करण्यात आले. विविध भजने, भारूड, जोगवा सादर करून भजनी मंडळाने आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. मंडळाच्या नलिनी पाटील, हेमलता देशमुख, वैशाली देशमुख, सरीता सूर्यवंशी, संध्या सूर्यवंशी, सुशीला माळी, मृदूंग वादक दिलीप राजपूत आदींनी यासाठी परीश्रम घेतले.

पंचपक्वानातून ‘लक्ष्मी’ने दिला तृप्तीचा ढेकर
शेतकरी व गायीत असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी देवरे परीवाराने एखाद्या सुवासिनीच्या डोहाळे जेवणात जे काही लागते ते सर्व लक्ष्मीच्या ओटीभरणासाठी आणले होते. कुटुंबियातील सदस्यांनी हिरवी साडी, फुलांचा हार, पाच फळे आणि ओटी भरल्यानंतर ५६ भोगांचा नैवेद्यही लक्ष्मीला देण्यात आल्याने तिनेदेखील तृप्तीचा ढेकर दिला.

यांचे सोहळ्यासाठी परीश्रम
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी देवरे परीवारातील दिनानाथ देवरे, कमलाक्षी देवरे, गायत्री देवरे, भरत दुसाने, रेणुका दुसाने, योगेश दुसाने, दीपिका दुसाने, कमलेश दुसाने, राधिका दुसाने, गणेश वाघ, उज्ज्वला वाघ, अमोल देवरे, निशिगंधा देवरे, विनायक देवरे, रुपाली देवरे, दीपक सोनार, गणेश सोनार आदींनी परीश्रम घेतले.