जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून पदवीच्या प्रथम आणि पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलणार असून, त्याची तयारी विद्यापीठाकडून सुरू झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमांमध्ये बदल केले जातात. मागील वर्षी काही विषयांचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून बीए, बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम वर्षाचा तर एमए, एमकॉम, एमएससी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. मात्र, चॉईस बेस क्रेडिट सिस्टिमची पदवी घेऊन विद्यार्थी २०११ मध्ये उत्तिर्ण झाल्याने पदवीवोत्तर अभ्यासक्रम २०२१-२२ मध्ये तयार करण्यात आला. अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेला सुरुवात अभ्यासक्रम बदल करण्यापूर्वी अभ्यास मंडळाच्या सभेमध्ये संबंधित विषयांचे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समित्या व उपसमित्या गठित केल्या जातात. त्यानंतर अभ्यासक्रम संबंधित विषयाचा अभ्यास मंडळाच्या सभेमध्ये विषय मांडून त्या-त्या विषयांच्या कार्यशाळा या महाविद्यालयाच्या मागणीनुसार घेण्यात येतात.
त्यात बदलणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येते नंतर समिती व उपसमिती तयार केलेले अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्या सभेत ठेवते. अभ्यास मंडळाने संबंधित विषयांची शिफारस केल्यानंतर त्या-त्या विषयांचा अभ्यासक्रम विद्या परिषद सभेपुढे मांडण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर मान्यता देण्यात येते. त्याअनुषंगाने महाविद्यालयांमध्ये कार्यशाळेला सुरुवात झाली आहे.
एनसीसी वैकल्पिक विषय म्हणून लागू
अभ्यासक्रमामध्ये एनसीसी हा विषय वैकल्पिक विषय म्हणून लागू करण्यात यावा, अशी मागणी १८ महाराष्ट्र बटालियन एसीसी युनिटचे समादेशक अधिकारी व धुळ्याच्या ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीतर्फे विद्यापीठाकडे करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएसस्सी वर्गासाठी एनसीसी वैकल्पिक विषय लागू करण्यात आला आहे. ज्या महाविद्यालयात एनसीसी युनिट सुरू आहे, अशा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना हा विषय घेता येईल.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..