जळगाव शहर

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा आज सकाळी पार पडला. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लँटचे, तर पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीखंड, लस्सी व पनीर या दुग्धजन्य पदार्थ उत्पादन सयंत्राचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते.

यांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, खासदार रक्षाताई खडसे, आमदार चिमणराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, वस्त्रोद्योग महामंडळाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खेवलकर, दूध उत्पादक संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, प्रभारी चेअरमन ॲड. वसंतराव मोरे, ‘महानंद’चे व्यवस्थापकीय संचालक श्यामसुंदर पाटील, दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये आदी उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने नवीन अत्याधुनिक प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. दूध संघाचा हा प्रकल्प अभिमानास्पद असून भविष्यात त्याचा विस्तार करावा. त्यासाठी आवश्यक सहकार्य आणि निधी उपलब्घ करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. दूध उत्पादक अडचणीत आला, तर राज्य शासन मदतीला येईल. दुग्ध व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. दूध संघाने हे तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोहोचवित दुग्ध उत्पादन व त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करावा. त्याबरोबरच देशी जातीच्या गायींचे संवर्धन करण्यावर भर द्यावा. कोरोना विषाणूसह निसर्ग, तौक्ते या चक्रीवादळांसह विविध संकटे राज्यावर आली आहेत. या संकटांबरोबरच कोरोना विषाणूचे संकट कायम आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने नागरिकांनी कोविड १९ अनुरूप वर्तन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात येवून दैनंदिन जनजीवन सुरळीत होईल तेव्हा एकरकमी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसह दोन लाखांवरील कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीबाबतची भूमिका राज्यातील सरकारची राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाने आपली क्षमता साडेतीन लाख लिटरवरून पाच लाख लिटरपर्यंत वाढविली आहे. सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. दुधावर प्रक्रिया करीत दुग्धजन्य उत्पादन वाढेल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यातील शासनाने ‘कोविड- १९’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या. नागरिकांना आरोग्याच्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. अतिवृष्टी, वादळ यासह आलेल्या नैसर्गिक संकटांना राज्य शासनाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

श्री. खडसे म्हणाले, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची १९७१ मध्ये स्थापना झाली. यंदा संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात संघाच्या नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहे ही समाधानाची बाब आहे. धवल क्रांतीचे भारतातील जनक डॉ. वर्गीय कुरियन यांच्यामुळे संघाला उर्जितावस्था प्राप्त झाली. सध्या ३७ कोटी रुपयांच्या ठेवी संघाच्या आहेत. तीन कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हे सर्व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. आगामी काळात दूध भुकटी, पशुखाद्य आणि विस्तारीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले.

दूध संघाच्या चेअरमन सौ. खडसे म्हणाल्या, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आधुनिक दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे संघाची क्षमता वाढली आहे. दूध संकलन आणि दूध विक्रीत वाढ झाली आहे. पशुपालकांना विविध सोयीसुविधा संघाच्या माध्यमातून पुरविल्या जातात. आगामी काळात चाळीसगाव, नशिराबाद येथे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी निधी आणि मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, मनीष जैन यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, सभासद उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button