जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२१ । जळगाव शहरामधील साधना हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टीकच्या कव्हर पॅक न करता तो चक्क बेडशीटमध्ये गुंडाळून तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे.
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. असं असताना देखील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेले साधना हॉस्पिटल अँड श्रद्धा क्रिटिकल केअर सेंटरमध्ये मृतदेह प्लास्टीकच्या बॅग न देता तो बेडशीटमध्ये दिला. कव्हर उपलब्ध नसल्याने आणि नातलग घाई करीत असल्याने तो तसा ताब्यात दिल्याचे संबंधित रुग्णालयाने मान्य केले आहे.
पाचोरा तालुक्यातील एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी जळगाव शहरातील आंबेडकर मार्केटसमोरील साधना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास देशमुख यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.
यावेळी मृतदेह प्लास्टीकच्या कव्हर पॅक न करता तो चक्क बेडशीटमध्ये गुंडाळून तो अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना देण्यात आला.