खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली, विद्यार्थी आला ट्रकच्या चाकाखाली
जळगाव लाईव्ह न्यूज । सागर निकवाडे । शहरातील रिंगरोडवरून अवजड वाहतूक करण्यास वेळ निश्चित करून दिलेली असताना देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असते. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून विद्यार्थी ट्रकच्या चाकाखाली आला. सुदैवाने अपघातात विद्यार्थी बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
कांचननगरातील प्रशांत चौकात राहणार लीलाधर संजय काळे (वय-२३) हा विद्यार्थी शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एमपी.३७.एमएल.९३८३ हे जात होता. नूतन मराठा महाविद्यालयाकडून तो रिंगरोडकडे जात होता. ट्राफिक गार्डनसमोर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीजवळ शेजारून जात असलेल्या ट्रक क्रमांक एमएच.३१.सीबी.०७९८ च्या पुढील चाकाखाली तो दुचाकी घसरून पडला. घटनास्थळी असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी तात्काळ रिक्षाने त्याला दवाखान्यात दाखल केले.
घटनेनंतर ट्रक चालकाने लागलीच पळ काढला. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून दुचाकी घसरल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शहरातील खड्ड्यांमुळे नेहमी अपघात होत असतात तरीही मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेत नाही. विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली आहे. रस्त्यावर ट्रक आणि अपघातग्रस्त बऱ्याच वेळ थांबून असल्याने रहदारी ठप्प झाली होती.