जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२१ । एरंडोल येथे कासोदा दरवाजा भागात रामभाऊ गांगुर्डे यांचे घराचे नव्या आर.सी.सी बांधकामासाठी कॉलम खोदत असताना जवळपास दहा फूट खोल व अडीच ते तीन फुट व्यासाचे अचानक भुयार पडले. ही घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. दगड व माती टाकून ते पुरण्यात आले.

एरंडोल हे ऐतिहासिक व प्राचिन शहर असून येथे भुयार पडल्याच्या घटना अनेकवेळा आढळून आल्या आहेत. पूर्वीच्या काळी धान्य साठविण्यासाठी धान्याची कोठारे असावित असा अंदाज जुन्या जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे, दरम्यान भुयार पडल्याची वार्ता परीसरात पसरताच घटनास्थळी भूयार पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती.