जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । पाचोरा तालुक्यातील सांगवी प्रलो येथील मागासवर्गीय वृद्ध महिलेने भोगवटा असलेल्या जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याने ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढून द्यावे, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर २२ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर सहाव्या दिवशी अधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी तासभर चर्चा करून महिलेचे मन वळवले तसेच उपोषण सोडवण्यात आले.

तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी उपोषण सोडण्याबाबत पोलिस निरीक्षक कार्यालयात रविवारी सकाळी तासभर बैठक घेत उपोषण सोडण्याबाबत मार्ग काढला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तहसीलदार कैलास चावडे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडवण्यात आले.
दरम्यान, सांगवी येथील वृद्ध महिलेच्या भोगवटा असलेल्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी महिलेने २२ तारखेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. गटविकास अधिकारी अतुल पाटील, विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी स्वतः महिलेची दोन वेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक गटविकास अधिकारी पवार व विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे यांनी गावी जावून अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केला.
मात्र, तेथील नागरिक गोंधळ घालत असल्याने ते माघारी फिरले. उपोषणकर्ती महिला उपोषण सुरू केल्यापासून अन्नपाण्याला शिवत नसल्याने चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती. यामुळे प्रशासनाला खडबडून जागे व्हावे लागले. अखेर सहाव्या दिवशी अधिकाऱ्यांनी तासभर चर्चा करून महिलेचे मन वळवले व तहसीलदार कैलास चावडे यांनी आगामी ४ ते ५ दिवसांत स्वतः सांगवीत येवून जागेची पाहणी केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सांगवी येथील त्या महिलेने उपोषण मागे घेतले आहे.