⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चोपड्यात भीषण आग ; घरात नसलेल्या भावासाठी तो धावत गेला, पण.. तरुणाचा शेवट भयानक

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२३ । चोपडा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील मुख्य बाजार पेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागलीय. या आगीमध्ये एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ६ जणांना या भीषण आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. गौरव सुरेश राखेचा (वय ३०) या तरुणाचा गुदमरूमन मृत्यू झाला. दरम्यान, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नेमकी काय आहे घटना?
चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठेत राहुल एम्पोरियम या कापड दुकानाची तीन मजली इमारत असून या इमारतीत राखेचा कुटूंबिय वास्तव्यास आहे. पहिल्या मजल्यावर त्यांचे राहुल एम्पोरियम हे कापड दुकान असून वरच्या दोन मजल्यामध्ये ते राहतात. कापड दुकानास मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली.

आग इतकी भयंकर होती की, आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होत्या. आग लागल्याचे घरात झोपलेल्या लोकांना कळाले नाही

या आगीतून घरात असलेले सुरेश राखेचा व कविता राखेचा यांना घरातून निघण्यात यश आले. यात कविता राखेचा या जखमी झाल्या आहेत. परंतु वरच्या मजल्यावर गौरव राखेचा आणि त्यांची पत्नी मोना राखेचा, संकेत राखेचा, शुभम राखेचा व लहान बाळ गौरव असे चारही रूममध्ये अडकून होते. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सर्वात अगोदर शुभम राखेचा यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर संकेत राखेचा, मोना राखेचा व लहान बाळ यांना चोपडा अग्निशमन दलातील कर्मचारी दीपक बडगुजर यांनी सुखरूप बाहेर काढले. यात त्यांचा हात भाजला.

यादरम्यान संकेत वरती अडकून आहे. या विचाराने गौरव राखेचा आपल्या पत्नीला सोडून परत वरती गेला. पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. भेदरलेला गौरव तिसऱ्या मजल्यावर बाथरूममध्ये लपून बसला. यावेळी गल्लीबोळातील नागरिकांनी अथक परिश्रम करून सर्वांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गौरवचा बाथरूममध्ये गुदमरून मृत्यू झाला.

दरम्यान, या आगीत इमारतीचे दोनही मजले जळून खाक झाले आहेत. आग इतकी तीव्र होती की घरातील  पीओपी, भांड्यांचा जळून कोळसा झाला आहे. सोफ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेली नोटांची बंडले जळाली आहेत. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीवर सहा वाजता नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र गौरव याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.