जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । गेल्या तीन दिवसापासून मराठवाडा आणि लगतच्या भागात निर्माण झालेले चक्रीय वादळ गुरूवारी विरले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात वातावरणात बदल झालेला असून किंचित ढगाळ वातावरणामुळे खान्देशात गेल्या दाेन दिवसात तापमान ३८ अंशापुढे गेले आहे.
वाढत्या तापमानाची चाळीशीकडे वाटचाल असतांना विदर्भावर मात्र अवकाळी पावसाचे ढग आहेत. येत्या दाेन दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस हाेण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविलेला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वातावरण किंचित ढगाळ हाेते. हे वातावरण शुक्रवारी निवाळेल. दरम्यान, विदर्भावर मात्र पुढील दाेन दिवस अवकाळी पाऊस हाेण्याची शक्यता आहे. १३ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहील. तर जळगाव जिल्ह्यासह खान्देशात तापमानाचा पारा ३९ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. गुरूवारी जळगावात कमाल तापमान ३८.७ अंश तर किमान तापमान १८ अंशपर्यंत हाेते. तापमानासाेबतच वाऱ्याचा वेग देखील ताशी १० किलाेमिटर पर्यंत वाढू शकताे.