जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आलं असून याबाबतचा जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिलेल्या निर्देशानुसार गट विकास अधिकारी, पंचायत समिती धरणगाव यांनी निलंबन आदेश जारी करण्यात आला आहे. सुरेश चंद्रा सोनवणे असं निलंबित शिक्षकाचे नाव असून वारंवार गैरहजेरी व शाळेत मद्यपानाच्या अवस्थेत येण्याच्या गंभीर तक्रारींमुळे ही कारवाई करण्यात आलीय.

धरणगावमधील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळा दिनांक ६ ऑक्टोबर रोजी बंद अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंर शिक्षण अधिकारी, धरणगाव यांना दिल्यानंतर तत्काळ चौकशी सुरू करण्यात आली. केंद्र प्रमुखांनी संबंधित शिक्षकास नोटीस बजावली असता, ते शाळेत अनुपस्थित असल्याचे आढळून आले.

यानंतर गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख चांदसर व केंद्र प्रमुख पाळधी यांनी ९ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष शाळेस भेट देऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान ग्रामस्थ, पालक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सहशिक्षकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध वारंवार मद्यपान करून शाळेत येणे, वर्ग अध्यापन न करणे व शाळेतून अनधिकृतरीत्या अनुपस्थित राहणे अशा गंभीर तक्रारी नोंदवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तातडीने दखल घेत, संबंधित शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.
त्यांच्या आदेशानुसार, गट विकास अधिकारी, पंचायत समिती धरणगाव यांनी १० ऑक्टोबर रोजी शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.







