‘देश का नमक’ वाढवणार महागाईचा खारटपणा, वाचा काय केली घोषणा
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्ह काही दिसत नाहीय. महागाई (inflation) दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच आता महागाईने त्रस्त असलेल्या देशातील जनतेची चव आता बिघडणार आहे. खरे तर अन्नामध्ये मीठाची (salt) भूमिका महत्त्वाची असते. देशाला मीठ देण्याच्या बाबतीत टाटा सॉल्ट हे सर्वात मोठे नाव आहे. पण, महागाईच्या दबावाखाली आता कंपनी आपल्या किमतीत वाढ करून जनतेला मोठा झटका देणार आहे.
टाटा कंझ्युमरच्या सीईओने दिल्या सूचना
टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी आणि सीईओ सुनील डिसूझा यांनी एका मुलाखतीदरम्यान टाटा सॉल्टच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, टाटांच्या मिठावर महागाईचा दबाव कायम आहे. अशा परिस्थितीत मार्जिन वाचवण्यासाठी आम्ही मिठाच्या किमती वाढवण्याची तयारी करत आहोत.
ऊर्जा खर्च वाढण्याचे मोठे कारण
मिठाची किंमत दोन घटकांवर आधारित असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. यापैकी, पहिला समुद्र आहे आणि दुसरा ऊर्जा आहे. ब्राइनच्या किमती सध्या स्थिर आहेत, परंतु ऊर्जेचा खर्च उच्च पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे मिठाच्या मार्जिनवर दबाव दिसून येत आहे. टाटा कंझ्युमरच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, कंपनीने टाटा मिठाच्या किमती वाढवण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.
रोजच्या जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. अनेक मोठ्या घरांमध्ये मीठाचे अनेक पुडे लागतात. तर हॉटेल, रेस्टॉरंट एवढंच काय दारुच्या दुकानातही मीठाचा खप अधिक आहे. या सर्वांना मीठ दरवाढीचा फटका बसणार आहे. मिठाच्या किमती किती आणि कधीपर्यंत वाढतील, याचा खुलासा टाटा कन्झ्युमरने केलेला नाही. सध्या बाजारात टाटा सॉल्टचं एक किलोचं पॅकेट 28 रुपयांना मिळतं. टाटा नमक, हे देशात सर्वाधिक विक्री होणारे मीठ आहे, ते वाढल्याने ग्राहकांच्या खिश्यावर परिणाम होईल आणि किचन बजेटवर ताण पडणार आहे.