जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून काल शुक्रवारी जळगाव शहरात राज्यातील सर्वोच्च म्हणजेच ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या विक्रमी तापमानामुळे जळगावकर अक्षरशः होरपळून निघाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगावात तापमानाचा पारा सातत्याने चाळीशीच्या पार जात आहे. शुक्रवारी तर उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक घामाघूम झाले. दुपारी १२ ते ४ या वेळेत तीव्र उन्हामुळे मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिक अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.

जळगावात आगामी चार पाच दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशापर्यंत राहण्याचा अंदाज असून यामुळे पुढील काही दिवस उष्णतेच्या झळांचा सामना जळगावकरांना करावा लागणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २० मे नंतर जिल्ह्यातील हवामानात बदल होण्याचा अंदाज असून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.








