जळगावात उन्हाचा कहर कायम ! पारा ४२ अंशांवर स्थिर, उष्णतेतून दिलासा मिळणार का?

एप्रिल 15, 2026 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२६ । जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढली असून तापमानाचा पारा सलग काही दिवसांपासून ४२ अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच सूर्याने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केल्यामुळे जळगावकर अक्षरशः होरपळून निघाले आहेत. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

tapman

गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचा चटका बसत आहे, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता इतकी असते की घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गेल्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ४२.२ अंशावर होते. दिवसासह आता रात्रीच्याही तापमानात मोठी वाढ झाली आहे. किमान तापमान २४.३ अंशावर पोहोचले आहे. एकीकडे दिवसा उष्णतेच्या झळा तर रात्री असह्य उकाडा जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस जिल्ह्यात तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून तापमानाचा पारा ४१ ते ४३ अंशांवर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या तडाख्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहे.

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे रुग्णालयांमध्ये उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे आणि निर्जलीकरणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचेही समोर आले आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे, भरपूर पाणी पिण्याचे आणि उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories