जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्यानं थंडीने आपले बस्तान गुंडाळले असून उन्हाळ्याची आता चाहूल लागली आहे. कमाल तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला असून किमान तापमानानेही २० अंशापर्यंत मजल मारली असून फेब्रुवारीतच मार्च महिन्यासारखे तापमान वाढल्याचं दिसतेय. तापमानात वाढ झाल्यानं जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आजपासून तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यापर्यंत पहाटे जाणवणाऱ्या थंडीने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. या आठवड्यात पहिल्या दिवशी जळगावचे कमाल तापमान ३२ अंश तर रात्रीचे किमान तापमानही १५ अंश सेल्सिअसच्या घरात होते. यामुळे रात्री आणि पहाटे काहीशी थंडीचा गारवा जाणवत होते. मात्र मागच्या चार ते पाच दिवसात तापमानात वाढ झालीय. त्यामुळे थंडी संपून उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे.

शनिवारी जळगावचे कमाल तापमान ३४.५ अंश तर किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस इतके होते. यामुळे उकाड्यात वाढ झाल्यानं जळगावकर हैराण झाला आहे. दरम्यान अशातच आज म्हणजेच २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडे राहणार असून, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच वाढणाऱ्या उष्णतेमुळे यंदा उन्हाळा लवकर सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.







